प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित जिमनास्टिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या चिमुरड्यांचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी कौतुक केले.
‘एक्सेल इंडिया जिमनास्टिक स्पोर्ट्स अकॅडमी’चे विद्यार्थी राज्य स्तरावर आयोजित जिमनास्टिक स्पर्धेत सहभागी झाले होते. या खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवित पदकांची लयलूट केली आहे. २२ मार्च रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धकांशी मुकाबला करीत वर्धेतील खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवित पदके प्राप्त केली. ६ ते ८ वयोगटात मितांश रामटेके याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे तर याच वयोगटात सा-या बुरांडे हिने रजत पदक पटकावले आहे. तसेच मिस्टी गजबिये आणि अवंती भोसकर यांनी ही दमदार कामगिरी केली. अंडर १० वयोगटात आरोग्य बाळसराफ आणि अधिरा ढोणे यांनी तर अंडर १२ मध्ये मीत डोडानी आणि अंडर १४ वयोगटात दिव्य सोलंकी व गाथा मून यांनी कांस्यपदक मिळवून आपल्या अकॅडमीचा आणि वर्ध्याचा गौरव वाढवला आहे.
स्पर्धेत नेत्रदीपक यश प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा गुरुवारी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे अकॅडमीचे प्रशिक्षक प्रणय वैद्य यांची अहोरात्र मेहनत आहे. तसेच अकॅडमीचे अध्यक्ष प्रितेश रामटेके, संजय दुग्धबले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशाबद्दल प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली शिरपूरकर आणि वर्धा जिल्हा जिमनास्टिक असोसिएशनचे सचिव राजेश बनमारे यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.