नज फाऊंडेशनचे शिक्षण, पर्यावरण, उद्योजकता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. फाऊंडेशनच्या भागीदारीतून वर्धा जिल्ह्यात प्रेस्बायोपिया निदान आणि चष्मा वितरणाचे एक ‘मॉडेल’ तयार होईल. प्रतिबंधात्मक अंधत्व नियंत्रण हे माझ्या प्राधान्याच्या बाबीपैकी एक उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी फाऊंडेशनचे सहकार्य चांगले योगदान देईल, असे सामंजस्य करारात नमूदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वर्धाचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व आ. सुमित वानखेडे यांच्या विशेष पुढाकारातून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
नज फाऊंडेशनसोबत भागीदारीतून संपूर्ण राज्याला ‘प्रेस्बायोपिया’ मुक्त करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी या आजाराचे निदान व चष्मे वाटप निश्चित करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ३ ते ६ महिन्याच्या कालावधीत प्रायोगिक तत्वावर ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी साधारणपणे ४ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या कामात वर्धाला ‘मॉडेल’ जिल्हा बनवून पुढे संपूर्ण राज्यात वर्धाच्या हा उपक्रम राबविला जाईल.
सन २०२४ साली वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या साधारणपणे १४ लाख इतकी होती. त्यातील ग्रामीण लोकसंख्या ६७ टक्के म्हणजेच ९ लाख इतकी आहे. ग्रामीण भागात साधारणपणे २ लाख प्रेस्बायोपियाचे रुग्ण असण्याचा अंदाज आहे. प्रत्येक नागरिकाची विनामूल्य प्रेस्बायोपियाची तपासणी करून आजार आढळून आलेल्या रुग्णांना विनामूल्य चष्मे वितरित केले जातील. प्रेस्बायोपिया रुग्णांची तपासणी व चष्मे वाटपानंतर त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन त्यांचा वार्षिक नफा १३० कोटी रुपयाने वाढण्याचा अंदाज आहे.
नज फाऊंडेशनच्या भागीदारीतून ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्यातील ३५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तींमध्ये प्रेस्बायोपियाबाबत जनजागृती केली जातील. यासाठी आशा, नेत्र सखींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नेत्रतज्ज्ञ, नेत्र सखी, आशा ग्रामस्तरावरच प्रेस्बायोपिया तपासणी करतील. हा आजार आढळून आलेल्या रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे गावातच चष्मे वाटप करतील. नज फाऊंडेशन उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य व आवश्यक तेवढे चष्मे तसेच आवश्यक साहित्याचा पुरवठा करतील. मोहिमेंतर्गत प्रशिक्षण तसेच उपक्रमाचे नियंत्रण व मूल्यमापन करणार आहे.