महाराष्ट्र हे उद्योग व गुंतवणुकीची उत्कृष्ट परिसंस्था असलेले राज्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ब्रिटनमधील खासदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई : महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त परकीय गुंतवणूक असलेले राज्य आहे. हे देशाचे आर्थिक पॉवर हाऊस असून देशाची ‘स्टार्टअप कॅपिटल’ आहे. महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट परिसंस्था असलेले राज्य असून त्यामुळे राज्यात ब्रिटनमधील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंत्रालयात ब्रिटनमधील बर्मिंगहॅमचे खासदार लियाम बर्न यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली.

शिष्टमंडळाशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्याने ‘वन ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र हे देशाचे टेक्नॉलॉजी हब असून देशाच्या एकूण सकल घरगुू उत्पादनात राज्याचा १३ टक्के वाटा आहे. देशात डेटा सेंटरची ६० टक्के कॅपॅसिटी ही महाराष्ट्रात आहे. आपण ब्रिटनचे खरे राजदूत असून आपल्या शिष्टमंडळाची भेट राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये व्यापक आर्थिक आणि व्यापार करार झालेला आहे. हा करार महाराष्ट्र आणि ब्रिटनसाठी मैलाचा दगड ठरणारा असून कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्येही व्यापार वृद्धिंगत होईल.

राज्याच्या प्रत्येक भागात उत्पादन क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक येत आहे. राज्यात २०३० पर्यंत एकूण ऊर्जा गरजेपैकी ५२ टक्के ऊर्जा ही नूतनीकरणीय क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण करण्याच्या ध्येयपूर्तीसाठी शासन काम करीत आहे. केंद्र शासनाने नवीन शिक्षण पद्धतीनुसार देशात विदेशी विद्यापीठांना परवानगी दिली आहे त्यानुसार महाराष्ट्र नवी मुंबई परिसरात एज्युसिटी उभारत आहे. यामध्ये विदेशी विद्यापीठांकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. एज्युसिटीमध्ये शैक्षणिक दालने उघडण्यासाठी ब्रिटनमधील विद्यापीठांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ देण्यात आले आहेत. या वर्षापासून ही विद्यापीठे अभ्यासक्रमही सुरू करीत आहेत. येथे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *