मुंबई : अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला सम प्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या. तसेच शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सहसचिव मनोज जाधव, उपसचिव मि. प. शेणॉय, अवर सचिव सारंगकुमार पाटील, अवर सचिव जहांगीर खान, अवर सचिव विशाखा आढाव तसेच अवर सचिव मेघना शिंदे उपस्थित होत्या.