सुकळी बाईच्या बँक ऑफ इंडिया शाखेवर दरोडा

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : सेलू तालुक्यातील सुकळी (बाई) गावात मुख्य रस्त्याच्या कडेला बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. सकाळी बँक उघडण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांना बँकेतील स्थितीवरून संशय आला. त्यांना बँकेची खिडकी तुटलेली असल्याचे निदर्शनास येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी लगेच शाखा प्रबंधक गौरव गावंडे यांना फोन करून माहिती दिली. याबाबत सावंगी पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली.

अज्ञात चोरट्यांनी वर्धा – आर्वी मार्गावरील सुकळी (बाई) येथील बँक ऑफ इंडिया शाखेत चोरी केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी ग्रील तोडून बँकेत प्रवेश करत २३ लाख रुपये चोरी केल्याची घटना मंगळवारी १३ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. माहिती मिळताच सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली.

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूच्या खिडकीच्या सळाखी तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी तिजोरीला छेद करत तब्बल २३ लाख ११ हजार रुपयांची रोकड लंपास केली. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून निकामी केले, तसेच वायरिंगदेखील तोडली. वर्षभरापूर्वी या बँकेची भिंत तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्यावेळी तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *