शिबिराच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक संवाद अधिक सक्षम होणार
वर्धा (जिमाका): पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या विशेष पुढाकारातून ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज हनुमान मंदिर परिसर प्रभाग क्रमांक १ येथे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच लाभार्थ्यांच्या अर्ज प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता शिबिराचे आयोजन करून पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री कार्यालयाचे योगेश देशमुख, यश आगे, रवी डोमाले, आकाश चावके, ऋषिकेश तहकिक, पियुष गांगरेड्डीवार, नयन करे यांच्यासह नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती निलेश किटे, नगरसेवक सतिश मिसाळ, नगरसेविका उज्वला पेठे, प्रफुल शर्मा, गुंजन मिसाळ, आशिष मिश्रा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच लाभार्थ्यांच्या अर्ज प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य करण्यात आले. तसेच नागरिकांकडून योजनेच्या लाभाकरिता अर्ज भरण्यात आले. पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत वर्धा शहरातील विविध प्रभागांमध्ये दि. १६ ते २२ मे या कालावधीत सानेगुरुजी नगर, गोंड प्लॉट, होमगार्ड ऑफिस रोड, अशोक नगर, राष्ट्रभाषा रोड, महादेवपुरा तसेच मोठी विहीर परिसरात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी सदर उपक्रम सुरु करण्यात आला असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अशा शिबिरांच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक सक्षम होत असल्याचे पालकमंत्री कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.