(अजीज शेख) प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : महाराष्ट्र राज्यातील ‘भोयर-पवार’, पोवार समाजाला तसेच प्रस्तावात समाविष्ट असलेल्या इतर जातींना केंद्रीय इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत भोयर पवार, पोवार समाजाकडून खासदार अमर काळे यांना वारंवार मागणी करण्यात येत होती. या समाजाला महाराष्ट्र राज्यात इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे व आरक्षणाचा लाभ देण्यात येत आहे. परंतु ह्या समाजाला केंद्राच्या इतर मागास प्रवर्गात समाविष्ट केले नसल्याने या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. भोयर पवार, पोवार समाजातील मुलांना उच्च शिक्षण घेतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. बरेच विद्यार्थी आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याने उच्च शिक्षणापासून वंचित राहात होते.
ह्या जातीचा केंद्राच्या आरक्षणाच्या सूचीत समावेश नसल्याने अनेक विद्यार्थी आपल्या भविष्या विषयी चिंतीत होते. भोयर पवार, पोवार समाज तसेच प्रस्तावातील इतर जातींना केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्गीय मंत्रालयाद्वारे संपूर्ण प्रक्रीया करुन प्रस्ताव तसेच मा. अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग यांचे शिफारशीसह प्रस्ताव केंद्राकडे दि. ९.१०.२०२४ ला सादर केला आहे. परंतु प्रस्तावावर कार्यवाही न झाल्याने खासदार अमर काळे यांनी संसदीय सत्रात दि. २६.०३.२०२५ ला लोकसभेमध्ये हा मुद्दा शुन्य प्रहरात उपस्थित केला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी केंद्रीय मंत्री मा.ना. श्री. विरेंद्र कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सुद्धा या बाबीविषयी पाठपुरावा केला होता व केंद्रीय मंत्री विरेंद्रकुमार यांनी सुद्धा याबाबततीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे लेखी पत्राद्वारे खासदार अमर काळे यांना कळविले आहे.परंतु खासदार अमर काळे यांनी या हिवाळी सत्रात सुद्धा याबाबत केंद्रीय मंत्री विरेंद्र कुमार यांचेकडे या प्रस्तावाच्या मंजुरीकरिता सतत पाठपुरावा सुरू आहे.
ओबीसी महाराष्ट्र कृती समिती, नागपूर तर्फ श्री मोरेश्वर भादे व इतर पदाधिकाऱ्यांनी दि. १७.१२.२०२५ ला दिल्ली येथे खासदार अमर काळे यांची भेट घेतली व खासदार अमर काळे यांनी भोयर पवार, पोवार तसेच इतर प्रस्तावातील जातींना केंद्राच्या इतर मागास प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याबाबत खासदार अमर काळे यांचेकडून ज्या पोटतिडकीने मागणी व पाठपुरावा केला जातो त्याबद्दल सर्व मंडळींनी खासदार अमर काळे यांचे आभार मानले व हा प्रश्न जोपर्यंत भोयर पवार, पोवार तसेच इतर प्रस्तावातील जातीचा केंद्रीय इतर मागास प्रवर्गात समाविष्ट केला जात नाही तोपर्यंत या प्रश्नाला सतत पाठपुरावा करण्याबाबत विनंती केली. खासदार अमर काळे यांनी सुद्धा या प्रश्नावर सतत पाठपुरावा करून हा प्रस्ताव केंद्राकडून मंजूर करेपर्यंत मी सतत या प्रस्तावाच्या पाठीमागे राहील व या समाजाला केंद्राच्या इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याकरीता सतत प्रयत्नशील व पाठपुरावा करत राहील असे शिष्टमंडळाला आश्वासित केले. हा प्रश्न भोयर पवार, पोवार समाजातील उच्च शिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याने तो तडीस नेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असेही सुतोवाच केले.