प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : जिल्ह्यात कपाशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून या वर्षा कापूस निघूनही नाफेड मार्फत खरेदी करावयाचे केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागत होता. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या आवश्यक गरजा किंवा अडचणी लक्षात घेऊन शेतीची पुढील गरज भागविण्याच्या दृष्टीने निघालेला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना देईल त्या भावात विकावा लागला. यात कापसाचा दर हा हमीभावापेक्षा कमी असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले. पण नाईलाज म्हणून शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नव्हता. यात शेतकऱ्यांची दराच्या बाबतीत खाजगी व्यापाऱ्यांकडून होत असलेली फसवणूक लक्षात घेता काही शेतकऱ्यांनी सदर बाब खासदार श्री अमरभाऊ काळे यांचेकडे विषद केली.
यात शेतकऱ्यांची कशी फसवणूक होते ही सर्व घटना खासदारांच्या कानावर घातली आणि शेतकऱ्यांना कमीत कमी हमीभाव तरी मिळावा.या दृष्टीने जिल्ह्यातील सी.सी.आय. चे कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याबाबत विनंती केली. खासदार श्री अमर काळे यांनी खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीत शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक लक्षात घेता सी.सी.आय. चे कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याबाबत सी.सी.आय. चे अकोला येथील महाप्रबंधक यांच्याशी चर्चा करून सी.सी.आय. चे खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याबाबत निर्देश दिले व सोबतच शेतकऱ्यांकडून आलेल्या मागणीवर महाप्रबंधक सी.सी.आय. अकोला यांना केंद्र सुरु करण्याबाबत पत्र सुद्धा दिले.
खासदार श्री अमर काळे यांनी दिलेल्या पत्राची महाप्रबंधक सी.सी.आय. अकोला यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्ह्यात कापूस खरेदीचे सी.सी.आय. चे केंद्र सुरु करण्यात आले. सध्या जिल्ह्यात सी.सी.आय. चे सिंदी (रेल्वे), सेलू, आर्वी, तळगाव, कारंजा व इतरही ठिकाणी कापूस खरेदी केंद्रावर नाफेड मार्फत कापसाची खरेदी सुरु आहे. शेतकऱ्यांनी खासदार श्री अमर काळे यांचेकडे मांडलेली व्यथा खासदार साहेबांनी तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या पिळवणुकीपासून वाचविले याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांकडून खासदार साहेबांनी केलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले.