प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा: वर्ध्याचे तरुण चित्रपट निर्माते आदेश विनोदराव ढगे यांच्या ‘द व्हॉइस ऑफ ओल्ड’ या लघुपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ठसठशीत उपस्थिती नोंदवत पहिला परदेशी सन्मान मिळवला आहे. युरोपमधील स्लोव्हेनिया येथे झालेल्या प्रतिष्ठित लुक्सुझ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या लघुपटाला ‘उत्कृष्ट कथा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, चित्रपटाच्या आशयाची दखल घेत परीक्षक मंडळाकडून विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
या यशासोबतच या लघुपटाची आतापर्यंत देशातील विविध नामांकित चित्रपट महोत्सवांसाठी अधिकृत निवड झाली आहे. त्यामध्ये अभिजात आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, विंध्य आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, दादासाहेब देशमुख चित्रपट महोत्सव (अकोला), राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच केरळ लोककला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांचा समावेश आहे.
पुरस्कारांच्या बाबतीतही ‘द व्हॉइस ऑफ ओल्ड’ या लघुपटाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अभिजात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या लघुपटातील बालकलाकाराला उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाला असून, दादासाहेब देशमुख चित्रपट महोत्सव, अकोला येथे या लघुपटाला उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.