तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी खासदार अमर काळे आक्रमक!
मेफेड्रोन कारखाना आणि १४२ किलो डोडा पावडर जप्ती प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांमार्फत सखोल चौकशी करण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि सामाजिक, शैक्षणिक व नैतिक मूल्यांचा वारसा लाभलेल्या वर्धा जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. मेफेड्रोनसारख्या घातक अमली पदार्थांचे उत्पादन, डोडा पावडरची तस्करी, अवैध विक्री आणि साठवणुकीचे वाढते प्रकार जिल्ह्याच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर शरदराव काळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी ठाम मागणी केली आहे.
खासदार काळे यांनी आपल्या पत्रातून वर्धा जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. काही काळापूर्वी कारंजा परिसरात मेफेड्रोन या घातक अमली पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित मोठ्या कारखान्याचा पर्दाफाश झाला होता. या घटनेनंतरही अमली पदार्थांचे अवैध व्यवहार सुरू असल्याचे संकेत मिळत असतानाच, अलीकडेच कारंजा परिसरात तब्बल १४२ किलो डोडा पावडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या सलग घटनांमुळे जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे केवळ किरकोळ विक्रीपुरते मर्यादित नसून त्यामागे संघटित स्वरूपातील उत्पादन, पुरवठा आणि वितरण यंत्रणा कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या अवैध व्यवसायाचे सर्वाधिक गंभीर परिणाम जिल्ह्यातील तरुण पिढीवर होत आहेत. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, किशोरवयीन मुले आणि बेरोजगार तरुण अमली पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यात अडकण्याची भीती वाढत आहे. व्यसनामुळे तरुणांचे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याबरोबरच कुटुंबांमध्ये तणाव, आर्थिक संकट आणि सामाजिक अस्थिरता निर्माण होत आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे चोरी, लूटमार, मारहाण आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तींनाही खतपाणी मिळण्याची शक्यता खासदार काळे यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
अमली पदार्थांच्या व्यवसायावर प्रभावी नियंत्रण मिळवायचे असेल, तर केवळ किरकोळ विक्रेते किंवा प्रत्यक्ष पकडल्या गेलेल्या आरोपींवर कारवाई करून चालणार नाही. या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, उत्पादक, पुरवठादार, वितरक, आर्थिक व्यवहार आणि संबंधित गुन्हेगारीचे संपूर्ण जाळे उघड होणे आवश्यक आहे, अशी ठाम भूमिका खासदार काळे यांनी मांडली आहे. मेफेड्रोन निर्मितीच्या कारखान्याचे प्रकरण आणि १४२ किलो डोडा पावडर जप्तीची घटना यांची सखोल चौकशी करून या अवैध व्यवसायामागील संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये वर्धा जिल्ह्यात केंद्रीय नार्कोटिक्स एजन्सीच्या माध्यमातून विशेष तपासणी आणि निगराणी अभियान राबविण्याचा समावेश आहे. अमली पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्या आर्थिक स्रोतांची आणि अवैध संपत्तीचीही चौकशी करावी. तसेच जिल्हा पोलीस प्रशासन, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि संबंधित केंद्रीय व राज्य यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करून विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलीस कारवाईपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक पातळीवरही व्यापक करण्याची गरज खासदार काळे यांनी अधोरेखित केली आहे. शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण भागात तरुणांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबवावे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांसाठी योग्य उपचार, पुनर्वसन आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांना व्यसनमुक्त करून पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल, असेही त्यांनी सुचविले आहे.
वर्ध्याच्या युवा पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा!
वर्धा जिल्ह्याची ओळख गांधीविचार, सामाजिक मूल्ये आणि शैक्षणिक परंपरेशी जोडलेली आहे. अशा जिल्ह्यातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ही समस्या केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरती मर्यादित नसून जिल्ह्याच्या भवितव्याशी आणि समाजाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यामुळे या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित केंद्रीय व राज्य यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत आणि वर्धा जिल्ह्याला अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायातून मुक्त करण्यासाठी ठोस कारवाई करावी, असे आवाहन खासदार अमर काळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केले आहे.