फियरलेस फाल्कन्सने पटकावले विजेतेपद; अंतिम सामन्याला ४ ते ५ हजार प्रेक्षकांची उपस्थिती
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : युवा एकता क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय WCCL (वर्धा चॅम्पियन्स क्रिकेट लीग) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा समारोप २० नोव्हेंबर रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात झाला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः अंतिम सामन्याला वर्ध्यातील सुमारे ४ ते ५ हजार क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती लावून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला.
२० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता फियरलेस फाल्कन्स आणि बीरा या दोन बलाढ्य संघांमध्ये अंतिम सामना रंगला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. चुरशीच्या आणि रोमांचक लढतीत फियरलेस फाल्कन्स संघाने बाजी मारत WCCL स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट नियोजन, दर्जेदार क्रिकेट, खेळाडूंचा उत्साह आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे WCCL ने वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली.
या भव्य आयोजनासाठी पंकजजी भोयर, दिलीपजी किटे, प्रदीप ठाकूर, विपिन राऊत सर यांच्यासह इव्होनिथ स्टील, बँक ऑफ बडोदा शाखा, तिरुमला तिरुपती क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, आनंद फॅशन आणि जे.के. स्टील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्व मान्यवरांचे आणि प्रायोजक संस्थांचे WCCL समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
विशेष आभार वर्धेकरांचे!
या संपूर्ण स्पर्धेचे खरे यश म्हणजे वर्धेकरांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद. प्रत्येक सामन्याला लाभलेली प्रेक्षकांची उपस्थिती आणि अंतिम सामन्यादरम्यान मैदानावर जमलेला हजारो जनसमुदाय हा WCCL च्या यशाचा सर्वात मोठा पुरावा ठरला. वर्धेकरांनी दाखवलेले प्रेम, विश्वास आणि सहकार्य याबद्दल WCCL समितीच्या वतीने सर्व नागरिकांचे, क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांचे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
BY THE OWNERS. TO THE AUDIENCE. FOR THE PLAYERS. या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत WCCL ने वर्ध्यातील क्रिकेटला एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, भविष्यातही अशाच भव्य क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस युवा एकता क्रीडा मंडळाने व्यक्त केला.