नवरगाव येथे आदिवासी बांधव व शेतकऱ्यांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी : शेतकऱ्यांना दिवाळी फराळाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप
वर्धा (जिमाका) : सरसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. भविष्यत पाणी टंचाई निर्माण होणार नाही, टंचाई जाणवल्यास त्याचा सामना करण्यासाठी शासन, प्रशासनस्तरावर नियोजन करण्यात आले आहे. टंचाई निवारणासाठी नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे, त्यामुळे नागरिकांनी आतापासून पिण्याच्या पाण्याच्या सोबत शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
सेलू तालुक्यातील नवरगाव पुनर्वसन ग्रामपंचायत येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधव व शेतकऱ्यांसोबत दिवाळी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, तहसीलदार डॉ.कुंतला पाराजे, गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे, मयूर महाराज दरणे, किशोर दिघे, अशोक कलोडे, विनोद लाखे, माजी सरपंच श्रीमती कडूकर, राहुल वांदिले, प्रफुल खोडे आदी उपस्थित होते.
राज्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. संकटकाळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत देण्याचे काम करीत आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना बळ, आधार व आत्मविश्वास देण्यासाठी हा दिवाळी उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारात नवरगाव, गरमसूर गावासह इतर गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. नवरगावचे पुनर्वसन करताना जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला असल्याने राज्यातील इतर गावांशी सुद्धा नवरगावप्रमाणे भूसंपादन मोबदल्याची मागणी होत असल्याचे यावेळी पालकमंत्री भोयर यांनी सांगितले.
पुनर्वसित नवरगाव्यात आवश्यक त्या चांगल्या सुविधा निर्माण करून देण्यात आल्या असल्याचे कुश मोटवाणी यांनी सांगितले. भारतामध्ये दिवाळी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो, परंतु यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत शासनाचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यासोबतच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करीत आहे, ही अभिमानाची बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होत असल्याचे मयूर महाराजम्हणाले. यावेळी श्रीमती कडूकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फराळाचे वितरण करून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दिप प्रज्ज्वलन करण्यात आले.
तत्पूर्वी नवरगाव ग्रामपंचायतीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार शंकुतला पाराजे यांनी केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.