तीन जणांवर गुन्हा दाखल, सावंगी पोलिसांची कारवाईवर्धा : पेट्रोलची अवैध रित्या चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत ५ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सावंगी (मेघे) पोलिसांनी केली. सावंगी (मेघे) पोलिसांचे पथक गस्त करत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून दहेगाव (गावंडे) ते सालोड (हिरापूर) कडे जाणाऱ्या मार्गावर नाकेबंदी करताना मालवाहू वाहन शिताफीने थांबवून पाहणी करण्यात आली.
मालवाहू वाहनात प्लास्टिक डबक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध पेट्रोल ज्वलनशील पदार्थ आढळून आले. चालकाने विशाल दत्ताजी लखाबादे (वय ३१) रा. क्षीरसमुद्रपूर, ता. सेलू, जि. वर्धा असे नाव सांगितले. त्याच्यासोबत वाहनात असलेल्या साथीदारांनी स्वप्नील आनंदराव सुरजुसे (वय ३१) रा. येळाकेळी, ता. सेलू, सचिन शंकरराव वानखेडे (वय ३४) रा. येळाकेळी ता. सेलू अशी सांगितली. त्यांना ताब्यात घेऊन वाहनाचालकाच्या ताब्यातून १५ मोठ्या प्लास्टिक कॅनमध्ये ४५० लिटर पेट्रोल, प्लास्टिक नळी, एम.एच २७ एक्स. ८५२३ क्रमांकाचे वाहन असा ५ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, पोलिस उपनिरीक्षक सचिन कानडे, संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून यांनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन कानडे करीत आहेत.