म. ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांनी घेतला लाभ

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे- वर्धा सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अस्थिशल्यचिकित्सा विभागाने मागील तीन वर्षात एक हजाराहून अधिक नितंब व गुडघ्याच्या सांधे बदल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्णत्वाला नेल्या आहेत.शासनाच्या महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रियांचा विनामूल्य लाभ मध्यभारतातील रुग्णांना घेता आला.

कधीकाळी रुग्णांना सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियांसाठी महानगरांकडे धाव घ्यावी लागत असे. मात्र, ग्रामीण भागात वसलेल्या सावंगी रुग्णालयाने सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असलेली शस्त्रक्रियागृहे, प्रगत उपकरणे आणि जागतिक दर्जाची आरोग्यसेवा निर्माण करीत वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. तज्ज्ञ अस्थिशल्यचिकित्सकांमुळे अत्यंत गुंतागुंतीच्या व जोखमीच्या शस्त्रक्रिया कुशलतेने पार पाडतानाच शस्त्रक्रियेनंतरचे रुग्ण व्यवस्थापन, उत्तम शुश्रूषा आणि सुरक्षित अतिदक्षता विभाग या सेवांनी या यशात भर टाकली आहे.

खाजगी रुग्णालयांमध्ये बदलण्याच्या शस्त्रक्रियांसाठी सामान्यतः २ ते ३ लाख रुपये खर्च येतो. मात्र, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांना सावंगी मेघे रुग्णालयात मोफत उपचार प्राप्त झाले आहेत. या यशस्वी वाटचालीत अस्थिशल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर अंबाडे, डॉ.संदीप श्रीवास्तव, डॉ. संजय.देशपांडे, डॉ. गजानन पिसूळकर, डॉ. हितेंद्र वांबोरीकर, डॉ. सुहास लांडगे आणि सहकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे तर, रुग्णांनाअद्ययावत सुविधा विनामूल्य प्राप्त व्हाव्यात, यासाठी अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रधान सल्लागार सागर मेघे, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांचे मार्गदर्शन आणि सर्वतोपरी सहकार्य लाभले.आहे.

या तीन वर्षात आजघडीला १,०५० शस्त्रक्रिया कोणताही संसर्ग किंवा गुंतागुंतीशिवाय पूर्णत्वाला नेल्या आहेत. पूर्णतः बरे झालेले हे सर्व रुग्ण पुन्हा दैनंदिन कामे करत आहेत आणि आपल्या कामावर परतून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत, हीच आमच्यासाठी खरी मिळकत आहे, अशी भावना ज्येष्ठ अस्थिशल्यचिकित्सक डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *