बालवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पहिल्या हजार दिवसांचे मिशन’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माता-बालक केंद्रित एकात्मिक दृष्टिकोनातून काम करा; डेटा आधारित देखरेख यंत्रणा उभाारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : बालवस्थेतील सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी माता आणि बालक यांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीने काम करावे. त्यासाठी आरोग्य आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे ‘हजार दिवसांचे बालव्यवस्था विकास मिशन’ तयार करावे आणि मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडला. या मिशनसाठी स्वतंत्र सचिवालय स्थापन करून त्यामार्फत नियमितपणे डेटाआधारित देखरेख केली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक क्षेत्रातील वॉर रूम बैठकीत बालवस्थेतील सर्वांगीण विकास या विषयावर सादरीकरण व सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत विविध तज्ज्ञांनी तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी मांडलेले अनुभव, उपक्रम आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. मेघालयमध्ये राबविण्यात आलेले उपक्रम, राज्यातील विविध भागातील यशस्वी अनुभव, आदिवासी क्षेत्रातील आव्हाने तसेच नागरी भागातील बालकांच्या पोषणविषयक स्थितीबाबत विचारविनिमय करण्यात आला.

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात जाणाऱ्या अनेक समस्यांचे मूळ बालवस्थेतील विकासाशी जोडलेले असल्याचे नमूद करून केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग अनेक वर्षांपासून या विषयावर कार्यरत असले, तरी अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने परिणामाधारित आणि पुराव्यांवर आधारित पद्धतीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मातामधील रक्तक्षय, कुपोषित बालकांचा जन्म, स्तनपान, लसीकरण आणि पोषणविषयक बाबींचा सातत्याने मागोवा घेणे आवश्यक आहे. विशेषतः आदिवासी भागात प्रभावी हस्तक्षेपाची गरज असून आरोग्य व महिला व बालविकाससह आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास आणि शालेय शिक्षण विभागासह सर्व संबंधित विभागांच्या भूमिका निश्चित कराव्यात. बैठकीत सादर झालेल्या विविध चांगल्या उपक्रमांमधून ठोस परिणाम मिळाले असून या अनुभваंचा विचार करून राज्याच्या परिस्थितीनुसार प्रभावी उपाययोजनांची आखणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

बालवस्थेतील विकासाशी संबंधित समस्या या बहुविभागीय स्वरूपाच्या असल्याने केवळ विभागनिहाय उद्दिष्टे निश्चित करून त्या सोडविता येणार नाहीत. माता आणि बालकांचा एकात्मिक विकास हेच मिशनचे अंतिम उद्दिष्ट असावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. महिला व बालविकास आणि आरोग्य विभागांचे प्रमुख भागधारक म्हणून इतर विभागांशी चर्चा करावी. त्यांच्या अडचणी समजून घेऊन आदिवासी विकास, ग्रामविकास आणि शालेय शिक्षण विभागासह सर्व संबंधित विभागांच्या भूमिका निश्चित कराव्यात.

शहरी भागासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज

बालकांच्या विकासाशी संबंधित प्रश्न केवळ ग्रामीण भागापुरते मर्यादित नसून शहरी भागातही त्यांची तीव्रता मोठी आहे. विशेषतः झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या भागात कुपोषणाचा प्रश्न असून त्यासाठी पुरेशी संरचित यंत्रणा आणि सातत्यपूर्ण हस्तक्षेपाची आवश्यकता आहे.

महाराष्ट्रात शहरीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, पूर्वी सुमारे ३० टक्के शहरी लोकसंख्येचा विचार करून उभारलेल्या व्यवस्था आज ५० टक्क्यांहून अधिक शहरी लोकसंख्या असलेल्या राज्यासाठी पुरेशा ठरत नाहीत. त्यामुळे शहरी भागासाठी आरोग्य विभागाच्या नव्या ‘अर्बन व्हर्टिकल’चा प्रभावी वापर करून स्वतंत्र आणि संरचित व्यवस्था उभारण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

अंगणवाडी, पोषण आणि इतर मूलभूत सेवांबाबत विभागीय अधिकार किंवा खर्चाच्या छोट्या प्रश्नांमुळे काम अडू नये. शासनाची गुंतवणूक ही संपूर्ण समाजासाठी असते, विभागापुरती मर्यादित नसते. त्यामुळे अशा बाबी समन्वयाने सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *