सामाजिक संघटनांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह सर्व धर्मीय सणोत्सव, जयंती उत्सव, लग्न समारोह, तसेच सार्वजनिक, सामाजिक व राजकीय कार्यक्रमांदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण, कर्णकर्कश ध्वनिर्वधके, लेझर शो, फटाक्यांचा वेळोवेळी होणारा अतिरेकी वापर तसेच सार्वजनिक रस्तयांवर मंडप टाकल्याने वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे टाळण्याबाबत विविध संघटनांद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यात सर्व धर्माचे सणोत्सव तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रम शांततापूर्ण, सामाजिक सलोखा जोपासत व नियमांचे पालन करून साजरे व्हावेत आणि नागरिकांना कोणताही त्रास न होता सर्वांनाच उत्सवांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने सदर निवेदन देण्यात आले. सुमारे ६०० जागरूक व संवेदनशील नागरिकांच्या सह्या असलेल्या या निवेदनात सर्वच प्रकारच्या आयोजनाबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधितांना पूर्वसू सूचना द्याव्यात व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण व अडथळ्यांमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी आयोजकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन सामाजिक संघटनांद्वारे करण्यात आले आहे.
निवeden देताना विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच लागू असलेल्या कायदे व नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. संबंधित नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाद्वारे देण्यात आले.
यावेळी भारतीय लोकशाही अभियानाच्या सदस्यांसह आनंद निकेतनच्या संचालिका सुष्मा शर्मा, सत्यशोधक समाजच्या प्रा. नूतन माळवी, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष हरिश इथापे, बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष संजय इंगळे तिगांवकर, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक ॲड. अविनाश काकडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य ॲड. पूजा जाधव, अ.भा. अंनिसच्या महिला शाखा जिल्हा सचिव पल्लवी पाटोदकर बोदिले, पुरोगामी कार्यकर्त्या द्वारका इमडवार, ऋतुजा भोयर, लक्ष्मी लिचडे, वर्धा लिगल कट्टाचे ॲड. कपिलवृक्ष गोडघाटे, ॲड. निखिल बुरबुरे, आम्ही वर्धेकरच्या ओजस सुवि, प्रा. सुनील अंभोरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व जागरूक नागरिक उपस्थित होते.