लॅबग्रोन डायमंडच्या संपूर्ण मूल्यसाखळीत भारताने जागतिक नेतृत्व करावे – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

मुंबई :- प्रयोगशालात विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिने उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारावी. या उदयोन्मुख क्षेत्रात भारतीय उद्योगानै जागतिक नेतृत्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

भारतातील रत्न व आभूषण उद्योगातील उत्कृष्टता, नेतृत्व आणि उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारा ५२ वा इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स २०२६ सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पणन मंत्री जयकुमार रावल, खासदार गोविंद ढोलकिया, आमदार अमित साटम आणि कौन्सिल’ चे अध्यक्ष किरीट भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह रत्न व आभूषण क्षेत्रातील उद्योजक, निर्यातदार, उत्पादक, बँर्कस, महिला उद्योजक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, भारताकडे पायाभूत सुविधा, ऊर्जा, भांडवल आणि उद्यमशील व्यापारी वर्गाचे सामर्थ्य आहे. लॅबग्रोन डायमंडची जागतिक बाजारपेठ आगामी काळात मोठ्या प्रमाणात विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संधी ओळखून भारतीय उद्योगानै केवळ कामाची गतीच नव्हे, तर व्यवसायाची व्याप्तीही वाढवावी. भारतीय कंपन्यांनी जागतिक ब्रँड निर्माण करून प्रमुख शहरांमध्ये स्वतःची विक्री केंद्रें उभीरावीत. यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *