एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून द्या : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

उद्योग, एमआयडीसी, सीएमईजीपी योजनेचा आढावा

भूखंडधारकांची ए, बी, सी श्रेणीत वर्गवारी

पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या

वर्धा (जिमाका): एमआयडीसीतील खुलेभूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग, एमआयडीसी, सीएमईजीपी योजनेचा आढावा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वान्मथी सी, एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष प्रविण हिवरे, नागपूर विभागाचे उद्योग व सेवा सहायक शिवकुमार मुद्मवार, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग व सेवा सहायक आयुक्त सुनील हजारे आदी उपस्थित होते.

एमआयडीसीतील जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी एमआयडीसीतील उपलब्ध भूखंडांचा प्रभावी वापर करावा. भूखंड घेऊनही उद्योग सुरू न करणाऱ्या उद्योजकांचा सविस्तर आढावा घेऊन भूखंडधारकांची ए, बी आणि सी अशा त्रिस्तरीय श्रेणीत वर्गवारी करावी. प्रत्यक्ष उद्योग सुरू असलेल्यांना ‘ए’, उद्योग सुरू करून सध्या बंद असलेल्यांना ‘बी’, तर भूखंड घेऊन अद्याप उद्योग सुरू न करणाऱ्यांना ‘सी’ श्रेणीत समाविष्ट करून नियमानुसार कार्यवाही करावी. तसेच मुद्दामवार, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग व सेवा सहायक आयुक्त सुनील हजारे आदी उपस्थित होते.

पीएम विश्वकर्मा या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वर्धा येथून करण्यात आला होता. योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना कीट वाटप करताना त्यातून प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणाऱ्या लाभार्थ्यांच्या सर्व्हेक्षणाद्वारे शोध घ्यावा. अशा लाभार्थ्यांच्या व्यवसायासाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

जिल्ह्यातील उद्योगांना चालना देतानाच पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिक कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करावा. एमआयडीसीच्या विस्तारासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करताना भौगोलिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. टेकडीवरील जमीन अधिग्रहित न करता उद्योगांसाठी अधिक उपयुक्त व समतल जमीन उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले.

वर्धा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचा आढावा घेताना बोरगाव येथील एमआयडीसीचा विषय चर्चेत आला. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या औद्योगिक क्षेत्रांचा प्रभावी वापर करून नव्या उद्योगांना प्रोत्साहन देणे, बंद उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे आणि रिक्त भूखंडांचा योग्य वापर सुनिश्चित करणे, यावर बैठकीत भर देण्यात आला.

स्थानिक उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यावर भर : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

एमआयडीसी मध्ये उद्योजकांना नुस्ती जमीन देऊन काम होणार नाही तर त्यांना मुख्य रस्ता, पाणी, विद्युत सबस्टेशन आदी सुविधा उपलब्ध करून द्या. जिल्हा उद्योग केंद्र मार्फत बँकांशी समन्वय ठेवून कर्ज मंजुरीवर भर द्या. उद्योजकांच्या छोट्या छोट्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवून त्यांना सहकार्य करा. जिल्हाधिकारी व एमआयडीसी तसेच उद्योग केंद्राचे अधिकारी यांनी उद्योजकांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यावर भर द्यावा अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.

उद्योग मंत्र्यांनी साधला उद्योजकांशी संवाद
जिल्ह्यातील उद्योजकांशी उद्योग मंत्री उदय सामंत व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रदूषण महामंडळाची परवानगी, इंधन विहिरीची परवानगी, एमएसडीसीएल मार्फत मिळणारे अनुदान, फायर सेफ्टी ना हरकत प्रमाणपत्र आदीसाठी येणाऱ्या समस्या उद्योग मंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी संबंधित विभागाला यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *