वर्धा (जिमाका) : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियमाच्या कलम ८९ अ पोटकलम १ ते ६ मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. या सुधारणामुळे जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सुकर व कार्यक्षम होण्यासोबतच राज्यातील उद्योग अनुकूल वातावरण निर्माण होऊन उद्योग वाढीला व शेतक-यांना दिलासा मिळणार आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली यांनी कलम ८९ अ पोट कलम १ ते ६ मधील सुधारणा बाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीत केले.
बैठकीला उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, श्रीपती मोरे, आर्वी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, हिंगणघाटचे आकाश अवतारे, एमआयडी उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रविण हिवरे, क्रेडाई संघटनेचे प्रतिनिधी व दूरदृष्यप्रणाली द्वारे सर्व तहसिलदार उपस्थित होते.
कुळाला मालकी हक्क मिळाल्यानंतर १० वर्षांनी जमीन विक्री करताना शेतसाऱ्याच्या ४० पट नजराणा भरण्याची अट होती. ही रक्कम अत्यंत किरकोळ (३०-४० रुपये) असूनही, ती वसूल करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर ३ ते ४ वर्षे जात होती.
यामुळे कुळांची विनाकारण अडवणूक होत होती. आता हा ४० पट नजराणा पूर्णपणे रद्द करण्यात आला असून, कुळांना मोठा दिलासा मिळाल्याचे संजय तेली यांनी सांगितले.
औद्योगिक प्रकल्पांना ३ वर्षांची मुदतवाढ
मोठ्या औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन खरेदी करताना अनेक वर्षे लागतात. २०१६ च्या सुधारणेनुसार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, कोरोनासारखी जागतिक आपत्ती, एनसीएलटी (एनसीएलटी) मधील खटले किंवा दिवाणी न्यायाल्यातील वादामुळे अनेकदा प्रकल्प वेळेत सुरू करणे अशक्य होते. अशा ‘आवाक्याबाहेरील’ (Beyond Control) परिस्थितीत शासन आता प्रकल्पधारकांना ३ वर्षांची वाढीव मुदत देऊ शकणार आहे. ही मुदतवाढ देण्याचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांऐवजी राज्य शासनाकडे असतील, जेणेकरून निर्णयात एकवाक्यता राहील.
वर्ग एकचीच जमीन करता येणार खरेदी
औद्योगिक क्लस्टरसाठी जमीन खरेदी करताना आता केवळ ‘वर्ग-१’ च्या जमिनी खरेदी करता येतील. एखादी जमीन ‘वर्ग-२’ असल्यास, खरेदीपूर्वी तिचे ‘वर्ग-१’ मध्ये रूपांतर करणे अनिवार्य असेल, ज्यामुळे भविष्यातील कायदेशीर गुंतागुंत टाळता येईल. जमिनीच्या वापरात बदल केल्यानंतर ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना कळवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. माहिती न दिल्यास ५ पट रूपांतरण अधिमुल्व वसूल करण्याची तरतूद करण्यात आली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.