कारंजा तालुक्यातील देववाडी व पारधी बेडा येथे मलेरिया उद्रेक घोषित

५ विशेष पथकांद्वारे युद्धपातळीवर नियंत्रण कार्यवाही सुरु

वर्धा (जिमाका): कारंजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सारवाडी अंतर्गत येत असलेल्या देववाडी आणि पारधी बेडा या परिसरात मुंबई येथून कामानिमित्त गेलेल्या व गावी परतलेल्या नागरिकांमध्ये मलेरियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सद्यस्थितीमध्ये ६ रुग्ण मलेरिया आजाराने ग्रस्त आढळून आल्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने तात्काळ पावले उचलत या परिसरामध्ये मलेरिया उद्रेक घोषित केला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी ५ विशेष वैद्यकीय नियंत्रण पथके तयार करून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नलिनी विखे आणि जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनीत झळके यांच्यासह जिल्हास्तरीय साथरोग पथकाने थेट भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व तात्डीने उपाययोजनांचे आदेश दिले. मुंबईवरून परतलेल्या कुटुंबांमुळे संसर्ग झाला असल्याची शंका जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी व्यक्त केली असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. देववाडी व पारधी बेडा येथील काही कुटुंबे कामानिमित्त मुंबई येथे गेली होते. तिथे ते आजारी पडल्यामुळे आपल्या मूळ गावी परत आले. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत ६ नागरिकांचे अहवाल मलेरिया पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय देखरेखीखाली औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बाधित क्षेत्रात तातडीने ५ आरोग्य पथके कार्यान्वित करण्यात आली असून या पथकांद्वारे गावातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण, हाऊस-टू-हाऊस ताप असलेल्या रुग्णांचा शोध आणि तात्काळ उपचार केले जात आहेत. घरोघरी जाऊन रक्त नमुने तपासणी करण्यात येत आहे. गावातील सर्व नागरिकांचे स्क्रिनिंग केले जात असून संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने जागीच गोळा करून मलेरिया निदान व उपचाराची गती वाढवण्यात आली आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे, अबेटिंग करणे आणि डास प्रतिबंधक औषधांची धूर फवारणी व घरोघरी कीटकनाशक अंतर्गत फवारणी वेगाने सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मलेरियावरील आवश्यक गोळ्या आणि इतर वैद्यकीय साधनसामग्रीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. देववाडी व पारधी बेडा परिसरात घरात कोणालाही ताप, थंडी वाजून येणे, उलटीमळमळ किंवा डोकेदुखीचा त्रास असल्यास स्वतःच्या मनाने औषध न घेता तात्काळ गावात तैनात असलेल्या आरोग्य पथकाशी किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *