वर्धा (जिमाका) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू नियंत्रण कायदा अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात देवळी येथील १९ पान टपरीवर केलेल्या कारवाईत ३ हजार ८०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
सदर कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलूजा, सामाजिक कार्यकर्ता राहुल बुचुंडे, हर्षल ढोबळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे, गौरी पिंपरे, पियुष मानवटकर, पोलीस शिपाई अमोल मंडाळकर यांनी केली. देवळी येथील बसस्टॉप, इंदिरा गांधी चौक, एमआयडीसी परिसर व लगतच्या परिसरातील १९ पान टपरीवर कारवाई केली.
जिल्हाधिकारी वान्मथी सी व मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या आदेशानुसार तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. २०२१ च्या शासन निर्णयानुसार सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास, थुंकण्यास व धुम्रपान करण्यास मनाई तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे, सेवन करणे व धुम्रपान करण्यास कोटपा कायदा २००३ अंतर्गत मनाई आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी कळविले आहे.