नाचणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त

वर्धा (जिमाका): जिल्ह्यातील नाचणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. ही वर्धा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवांच्या गुणवत्तेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत National Health Systems Resource Centre (NHSRC), नवी दिल्लीच्या वतीने दिनांक २० ते २१ एप्रिल २०२६ रोजी केंद्राचे बाह्य मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगावने सर्व निकष पूर्ण करत ८४.१९ टक्के गुण प्राप्त केले असून केंद्राला ‘Quality Certified’ दर्जा बहाल करण्यात आला आहे.

या मूल्यांकन प्रक्रियेत रुग्णाभिमुख सेवा, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, औषध उपलब्धता, नोंदव्यवस्थापन, मातृ व बाल आरोग्य सेवा, प्रयोगशाळा सेवा तसेच प्रशासनिक कार्यप्रणाली आदी विविध विभागांची तपासणी करण्यात आली. केंद्राने सर्व विभागांमध्ये समाधानकारक कामगिरी करून राष्ट्रीय निकषांची पूर्तता केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ मंगेश रेवतकर, तालुका आरोग्य अधिकारी तालुका डॉ. मोनाली मामीलवार, डॉ. भागवत राऊत डॉ. प्रशांत वाडीभस्मे व डॉ. विनीत झलके यांच्या वेळोवेळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाने प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त होण्यास यश मिळाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या यशाबद्दल पराग सोमण तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नाचणगाव, संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांचे अभिनंदन केले. ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे मानांकन महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *