प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : डिझेल, पेट्रोलचा काळाबाजार करत अवैधधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनासह पाच लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पेट्रोलपंप मालक गिरीश राजपालसह अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई महिलाश्रम परिसरात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपनिय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे २ पथक महिलाश्रम परिसरातील वर्धा ते सेवाग्राम रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचे राजपाल पेट्रोलपंपजवळ दबा धरून होते. दरम्यान, एम.एच. ३२ ए.एस. ४८४३ क्रमांकाचे वाहन महिलाश्रम परिसरातील इंडीयन ऑईल कंपनीचे राजपाल पेट्रोलपंपकडे येताना दिसले. पोलिसांनी त्यास थांबविले असता वाहन चालक समीर शकील शेख (वय २२) रा. सेलू, रवींद्र विठ्ठलराव चोरे (वय ४५) रा. केळझर ता. सेलू हे मिळून आले.
वाहनाची पाहणी केली असता, वाहनात १४ प्लास्टिक डबकीमध्ये २९ हजार १२० रुपये किमतीचे २८० लीटर पेट्रोल, ६ प्लास्टिक डबकीमध्ये १० हजार ९२० रुपये किमतीचे १२० लीटर डिझेल, २० प्लास्टिक डबकी, वाहन, मोबाईल असा ५ लाख ७३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पेट्रोल व डिझेल भरून वाहतूक करण्याचा पासपरवाना विचारला असता त्यांच्याकडे नसल्याचे सांगितले.तसेच पेट्रोल व डिझेल खरेदी केल्याचे कोणत्याही पावत्या नसल्याचे पुढे आले.
रवींद्र चोरे याने केळझर परिसरातील ढाब्यावर पेट्रोल व डिझेल टँकर चालकांकडून कमी भावाने खरेदी केलेले असून ते साठवणूक करून महिलाश्रम परिसरातील इंडीयन ऑईल कंपनीचे राजपाल पेट्रोलपंप मालक गिरीश राजपाल रा. मोहिनीनगर यास जास्त भावाने विक्रीकरीता वाहतुकीकरीता दिलेल्या वाहनात भरून वाहन चालकाचे मदतीने आणल्याची माहिती पुढे आली. पेट्रोलपंप मालक गिरीश राजपाल यास नियमितपणे पेट्रोल व डिझेलची विक्री करीत असल्याची माहिती पुढे आली. त्यावरून तिघांविरोधात वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.