अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलासेलू : येथील नगरपंचायत घनकचरा केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर दिनांक ३० एप्रिलचे दुपारी ४ वाजताच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली. प्रीतम पाटील (शेंडे) यांच्या शेतातील ट्रॅक्टर ट्रॉलीला अचानक भीषण आग लागली. या आगीत ट्रॉलीचे दोन्ही टायर जळून खाक झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार, स्मशानभूमी ते घनकचरा रोडवरील प्रीतम पाटील यांच्या शेतातील ट्रॅक्टर ट्रॉली घनकचरा प्रकल्पाच्या शेतात उभी असताना अचानक ट्रॉलीने पेट घेतला.
बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि ट्रॉलीचे दोन्ही टायर व शेतीयोग्य लोखंडी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. परिसरात धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच सेलू नगरपंचायतचे कर्मचारी फायरमन हर्षल गोरखे, फायरमन शुभम डोंगरे, प्रमोद रहांगडाले व सहाय्यक इमाम शहा यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे ट्रॅक्टरच्या इंजिनला आणि आजूबाजूच्या परिसराला आगीपासून वाचवण्यात यश आले. मात्र आग लागण्याचे कारण कळू शकले नाही.
या घटनेत प्रीतम पाटील यांचे आर्थिक नुकसान झाले असले, तरी अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याने परिसरातून कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.