प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या नावाने चालणाऱ्या सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी द्वारा संचालित कस्तुरबा रुग्णालयाला २५ टक्के केंद्र सरकार ५० टक्के महाराष्ट्र सरकार अनुदान देते या रुग्णालयाची आता दैनावस्था झाली आहे. अनेक विभागात डॉक्टर नाही, नर्सेसची कमी असे असतांनाही कोट्यावधीचे अनुदान लाटणाऱ्या या रुग्णालयात कर्मचाऱ्यांवर मात्र अन्याय होत आहे.
अनेक कर्मचाऱ्यांना लेखी परिक्षा घेवून १ वर्ष व २ वर्षाचे नियुक्तीपत्र देवून कामावर ठेवले. परंतु ५ ते ६ वर्ष झाले असतांना या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले नाही. नियमित करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केल्यानंतर त्यांना व्यवस्थापनाच्यावतीने सोडून द्या, अशा धमक्या दिल्या जातात. तर येथेच अनेक डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतरही मोठ्या पगारांवर नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन पदावरील कर्मचारी २१ जानेवारी २०२६ पासून बेमुदत उपोषण मुख्य द्वारांजवळ चालू केले आहे. डॉ. सुशिला नायर यांच्या मृत्यूनंतर या रुग्णालयात रुग्णांसह कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळणे आता कठीण झाले आहे.