वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या व्यवसाय वृद्धीसाठी सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतला आढावा

वर्धा (जिमाका): वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवसाय वृद्धी आणि सक्षमीकरणासाठी सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज नागपूर येथे आढावा घेतला. बँकेच्या सर्वंकष प्रगतीसाठी दीर्घकालीन उपाय योजना करा. पुढील पाच वर्षांचे नियोजन करून आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवसाय वृद्धीसाठी नागपूर येथील म्हाडा कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला आ. प्रवीण दरेकर, आ. अतुल भोसले, आ. सुमित वानखेडे, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी वानमथी सी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, नाबार्डच्या मुख्य प्रबंधक रश्मी दराड, सहसचिव संतोष पाटील यांच्यासह विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव, प्रमुख उपस्थित होते.

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी आणिआर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक निधी उभारण्याकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृष्णा नागरी सहकारी बँक आणि त्याच प्रकारच्या इतर वित्तीय संस्थांसोबत समूहकर्जपुरवठा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले.

बँकेची पुढील कार्यपद्धती निश्चित करणे आवश्यक असून भविष्यातील जोखीम कमी करण्यासाठी अत्यंत सुरक्षित क्षेत्रात कर्जपुरवठा करण्यावर भर देणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणावर बिगर शेती कर्जपुरवठाकरून बँकेच्या उत्पन्नात वाढ करणे. थकीत कर्ज वसुलीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून अनुत्पादक मालमत्ता कमी करणे. बँकेला व्यवसायातून प्राप्त होणाऱ्या नफ्यातून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने, राज्य सहकारी बँकेचे कार्यरत व सेवानिवृत्त झालेले तंत्र कुशल कर्मचारी, अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेण्यासाठी नियोजन करा.

बँकेतील सद्याची संगणक प्रणाली व सॉफ्टवेअर तातडीने अद्ययावत करून ग्राहकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करा, असे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व त्यांच्या अंतर्गत व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे बँकिंग व्यवहार वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत होण्यासाठी संबधितांना प्रोत्साहन करा. सहकारी संस्थांना त्यांचा निधी बँकेत गुंतविण्यासाठी आणि बँकेबद्दल त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी मोहिम हाती घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *