प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : शेतकऱ्यांना शेतीसोबतच पूरक व्यवसाय मिळावा तसेच त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे आमदार दत्तक ग्राम सलोड (हिरापूर) येथे गोट मार्केटची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा गंभीर परिणाम झाला आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. शेतीसोबतच शेतक- ऱ्यांनी दुग्ध उत्पादन व शेळी पालन करण्यासाठी शासनाने अनुदानावर योजना आरंभ केल्या आहेत. ग्रामीण भागात शेळी पालन व्यवसाय करणा- ऱ्यांची संख्या मागील काही वर्षांत वाढली आहे. परंतु शेळी पालन करणा- ऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत त्यांनी दत्तक घेतलेल्या सलोड गावामध्ये गोट मार्केट उभारण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले. जिल्हा नियोजन समिती मार्फत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत सलोड (हिरापूर) येथे गोट मार्केटची निर्मिती करण्यात येणार आहे.