पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केली आंजीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची पाहणी

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारेवर्धा : तालुक्यातील आंजी (मोठी) परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची वार्ता आहे. आंजी येथे नव्याने मंजूर ग्रामीण रुग्णालच्या जागेवर अंतिम मोहर लावण्यात आली आहे. गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जागेची पाहणी करीत बांधकामासंदर्भात संबंधित अधिका-यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतिष अंभोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुमंत वाघ, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, दीपक बावनकर, दिलीप रहाटाटे, देवानंद गोमासे, नितीन भावरकर, दिनेश उमक, विजय गामासे, सुनिल हंबर्डे, सुरेश गिरडकर, माधव बाकडे, संतोष बालपांडे, रामचंद्र बालपांडे, भाजपचे पदाधिकारी, नागरिक व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आंजी (मोठी) गाव वर्धा तालुक्यातील एक मोठे गाव असून या गावाच्या सभोवताल वर्धा, आर्वी व सेलू तालुक्यातील जवळपास ५० ते ६० गावे जोडली आहे. सदर गावे दुर्गम भागात असल्याने येथील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळताना अनेक अडीअडचणी येत होत्या. सदर भाग ग्रामीण असल्याने शेतात काम करीत असताना सर्पदंश अथवा अन्य घटना किंवा रात्री अपरात्री रुग्णांना उपचारासाठी नेताना अनेक अडचणी येत होत्या. जवळचे रुग्णालय वर्धा होते. वेळेपर्यंत रुग्णांना नेताना अनेकदा त्यांचा वाटेत मृत्यू होत होता. त्यामुळे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट यांनी आंजी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्याची मागणी शासन दरबारी लावली होती.

राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर त्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व भाजपाचे आ. राजेश बकाणे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळे दोघांनी शासन दरबारी हा विषय लावून धरल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने २४ सप्टेंबर २०२५ रोजी आंजी येथील ग्रामीण रुग्णालयाला मान्यता दिली. आंजी येथे ३० खाटांचे रुग्णालय होणार असून त्यावर अंदाजे २६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. रुग्णालयासाठी जागेची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जागेची पाहणी करून पायाभूत सुविधा, इमारत बांधकाम, सोयी सुविधांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. सुनिल गफाट यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच आंजी व परिसरातील गावांना आरोग्याची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *