उमेदवारांची छाननी प्रक्रिया आटोपली, आता अर्ज मागे घेण्याकडे लक्ष

प्रतिनिधी/दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : वर्धा जिल्ह्यात सहा नगर परिषदेकरिता निवडणूक होत आहे. वर्धा, आर्वी, देवळी, पुलगाव, सिंदी (रेल्वे), हिंगणघाट या सहा नगर परिषदांच्या नगराध्यक्ष, नगर सेवक पदाकरिता ही निवडणूक होत आहे. सहाही नगर परिषदेकरिता निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्याकरिता आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव केली. नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी पार पडली. छाननी प्रक्रिया दरम्यान विविध त्रुटींमुळे बाद झालेल्या अर्जानंतर नगराध्यक्षपदासाठी ५३ आणि नगरसेवक पदासाठी ८५५ उमेदवारी अर्ज वैध ठरले. आता नामनिर्देशनपत्र मागे कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळालेल्या तसेच अपक्ष उमेदवारांनी देखील नामनिर्देशन पत्र दाखल केले. पक्षाने तिकीट न दिल्यामुळे काही नाराज असलेल्या उमेदवारांनी देखील त्यांचे नामनिर्देशन पत्र निवडणुकीकरिता दाखल केले केले. नामनिर्देशन पत्राच्या छाननीची प्रक्रिया १८ नोव्हेंबर रोजी पार पडली. छाननी मध्ये कुणाचे अर्ज बाद होतात काय याकडे सर्वांचे लगले होते. छाननी नंतर वैध अर्जाची स्थिती स्पष्ट झाली आहे.

नगराध्यक्ष पदाकरिता ७२ आणि नगरसेवक पदाकरिता १००२ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. छाननी दरम्यान त्रुटी आढळल्यामुळे काही नामनिर्देशन पत्र बाद झालेत. छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर नगराध्यक्ष पदाकरिता ५३, नगरसेवक पदाकरिता ८५५ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये काही उमेदवारांनी दोन अर्ज भरले होते. निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. निवडणुकीच्या लढतीचे चित्र नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या वेळेनंतरच स्पष्ट होईल. वर्धा नगर परिषद सदस्यपदाच्या अर्ज छाननीत १५ नामांकन अर्ज बाद झाले तर २०७ अर्ज वैध ठरले. तसेच अध्यक्षपदाच्या अर्ज छाननीत १ अर्ज बाद झाला तर १२ अर्ज वैध ठरले.

देवळी नगरपरिषद सदस्यपदाच्या अर्ज छाननीत ३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर ७९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अध्यक्षपदाच्या अर्ज छानणीत २ उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

पुलगाव नगर परिषद सदस्यपदाच्या अर्ज छाननीत ७९ नामांकन अर्ज बाद झाले तर १३९ अर्ज वैध ठरले. अध्यक्षपदाच्या अर्ज छाननीत १ अर्ज बाद झाले तर ८ अर्ज वैध ठरले.

सिंदी (रेल्वे) नगर परिषदेच्या सदस्यपदाच्या अर्ज छाननीत ५ नामांकन अर्ज बाद झाले तर १९ अर्ज वैध ठरले. अध्यक्षपदाच्या अर्ज छाननीत ७ अर्ज वैध ठरले.आर्वी नगर परिषद सदस्यपदाच्या अर्ज छाननीत १४ नामांकन अर्ज बाद झाले तर १०४ अर्ज वैध ठरले. तसेच अध्यक्षपदाच्या अर्ज छाननीत ५ अर्ज बाद झाले तर ७ अर्ज वैध ठरले.

हिंगणघाट नगर परिषद सदस्यपदाच्या अर्ज छाननीत १३ नामांकन अर्ज बाद झाले तर २३५ अर्ज वैध ठरले. अध्यक्षपदाच्या अर्ज छाननीत सर्व १२ अर्ज वैध ठरले.

२१ नोव्हेंबर दुपारी ३ वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २१ ते २५ दरम्यान अपील असल्यास २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत याबाबतची प्रक्रिया पार पडेल.

नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या कालावधीमध्ये कोणते उमेदवार नामनिर्देशन पत्र मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *