माहेश्वरी भवन येथे अमृत मेळावा संपन्न

वर्धा (जिमाका) : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवती तसेच व्यवसाय सुरु करु इच्छिणार्‍या उमेदवारांसाठी राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही स्वायत्त संस्था सुरु करण्यात आली आहे. या संस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची व योजनांची माहिती देण्यासाठी माहेश्वरी भवन येथे अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे उद्घाटन अमृतपेठचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडीत, उपव्यवस्थापक विक्रम पांडे, ब्राम्हण सभेचे अध्यक्ष विलास कुलकर्णी, सचिव महेश देशपांडे, माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष विजय राठी, सचिव धर्मेद्र मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी -अमृत या संस्थेच्यावतीने युवक युवती व नवीन व्यवसाय सुरु करु इच्छिणार्‍यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक व सर्वांगीण विकासाचे दरवाजे खुले आहेत. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमोल चव्हाण यांनी केले. तसेच तसेच अमृपेठ या नव्या उपक्रमाची माहिती सांगून हे एक अत्याधुनिक खरेदी विक्री दालन असून स्थानिक उत्पादक व उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाला थेट बाजारपेठ उपलब्ध करुन देत आहे, असे सांगितले
देवदत्त पंडीत यांनी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणार्‍या शैक्षणिक योजना, कौशल्य विकास उपक्रम व उद्योग उभारणीसाठीच्या विविध प्रकल्पाबाबत माहिती उपस्थितांना सांगितली.

मेळाव्यास ब्राम्हण, माहेश्वरी, अग्रवाल, गुजराती, कोमटी, राजपूत, ठाकूर, पाटीदार, राजपुरोहित, सिंधी आदि खुल्याप्रवर्गातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन मनोज मोहता यांनी केले तर आभार जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेष खराटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूर विभागातील जिल्हा व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अमृत मित्र व सखी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *