५८ कोटींच्या बंधाऱ्याचे काम केवळ २० टक्केच का? खासदार अमर काळेंचा प्रशासनाला तात्काळ कारवाईचा इशारा
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे
हिंगणघाट : हिंगणघाट शहर आणि परिसरातील एमआयडीसीला (MIDC) पुरेसा पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने वणा नदीवर मंजूर करण्यात आलेल्या ५८ कोटींच्या बंधाऱ्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, मूळ मुदत संपूनही आतापर्यंत केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. एकीकडे संभाव्य पाणीटंचाईची चाहूल लागलेली असताना आणि दुसरीकडे अल निनो (El Nino) च्या प्रभावामुळे पावसाळ्यातील अनिश्चितता व उष्णतेच्या संभाव्य तीव्रतेमुळे आगामी काळात पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा नाजूक परिस्थितीत पाटबंधारे विभागाचा निष्काळजीपणा, ढिसाळ कारभार आणि कंत्राटदाराचे असहकार्य सामान्य जनतेसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप करत खासदार अमर शरदराव काळे यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाई व सविस्तर अहवालाचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात खासदार अमर काळे यांनी वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात नमूद केल्यानुसार, या ५८ कोटींच्या बंधाऱ्याच्या कामाची मूळ मुदत १ ऑगस्ट २०२६ पर्यंत होती. मात्र, नोव्हेंबर २०२६ उजाडल्यानंतरही कामाची प्रगती अवघी २० टक्क्यांवरच अडकून पडली आहे. अल निनोसारख्या हवामान बदलाच्या परिणामांमुळे जलसाठ्यांवर आधीच ताण येण्याची शक्यता वर्तवली जात असताना, नियोजित प्रकल्प वेळेत पूर्ण न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर उभे असताना दिवसेंदिवस पाण्याची टंचाई अधिक तीव्र होणार आहे. शासन संभाव्य संकटांवर उपाययोजना करण्याऐवजी फक्त केंद्रित करत असताना, अशा महत्त्वाच्या जलप्रकल्पाबाबत विभागाकडून दुर्लक्ष होणे योग्य नाही, असे खासदार काळे यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे. खासदार अमर काळे यांनी प्रशासनाकडे उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न व मागण्या:
कंत्राटदाराने काम वेळेत व समाधानकारक केले नसल्यास पाटबंधारे विभागाने आतापर्यंत कंत्राटदारावर कठोर कारवाई का केली नाही? रखडलेल्या बंधाऱ्याच्या पुढील बांधकामाचे ठोस नियोजन काय आहे? एवढे मोठे पाणी टंचाईचे संकट असताना प्रशासन व कंत्राटदार गप्प का? या संपूर्ण प्रकरणाबाबत वरिष्ठांनी तात्काळ दखल घ्यावी असेही खासदार अमर काळे यांनी नमूद केले आहे.
या पत्राची प्रत जिल्हाधिकारी, वर्धा यांनाही पाठवण्यात आली असून, संबंधित विभागाचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक व कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे आणि वाढत्या जलसंकटामुळे वणा नदीवरील बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे ही आता काळाची गरज बनली असून, प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते याकडे हिंगणघाट व वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. केवळ संकटाचा गाजावाजा करून लोकांना संकटाची भिती दाखवून घाबरवून सोडण्यापेक्षा व केवळ उपलब्ध जलस्रोतांची लोकांना माहिती द्यायची. पाणी कमी वापराचा संदेश द्यायचा म्हणजे लोकांकडून कोणती पाणीकपात प्रशासनाला अभिप्रेत आहे, असाही खासदार अमर काळे यांनी उपस्थित केला आहे.
समृद्धी मार्ग, नागपूर-तुळजापूर मार्ग व राज्यात भिमाशंकर, मावळ येथे जी वृक्षांची कत्तल झाली या बदल्यात किती झाडे लावली व कुठे लावली याचाही हिशोब प्रशासनाने द्यावा. केवळ लोकांना सल्ला द्यायचा व आपण मात्र काहीच करायचे नाही हे प्रशासनाने व सरकारने तात्काळ थांबवावे व खरोखरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मनापासून काम करावे असेही आवाहन खासदार अमर काळे यांनी केले आहे