जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयाची कमाल

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे

वर्धा: वर्धा जिल्हा हा दुष्काळ ग्रस्त जिल्हा जाहीर करण्यात आला आहे. तर वर्धा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र चालूच असून ९ महिन्यात १०७ शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावावे. यासाठी कृषि विभागाच्यावतीने अनेक योजना राबवल्या जातात. परंतु या योजना राबवताना लाभ मात्र खऱ्या शेतकऱ्यांना मिळत नाही. असाच प्रत्यय सेवाग्राम येथील चरखागृहात आयोजित शेतकरी प्रशिक्षण शिबिरात वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर एका खाजगी युवा शेतकरी ग्रुपने राज्यस्तरीय मेळावा तर कृषि विभागाने जिल्हास्तरीय प्रशिक्षण अशा दोन वेगवेगळ्या जाहिराती करून या प्रशिक्षणाचा धज्जा उडाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कृषि विभागाच्यावतीने कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) कृषि विभाग व युवा शेतकरी ग्रुप वर्ध्याच्यावतीने ३ व ४ ऑक्टोबरला सेवाग्राम चरखा गृहात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० रुपये तर राज्यातील इतर शेतकऱ्यांना ६ हजार रुपये अशी प्रवेश फी आकारण्यात आली होती. याची जाहिरात आयटी क्षेत्रातील एका तरुणाने फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडियावर केली. परंतु वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी फुल असल्याचे सांगत संकेतस्थळ बंद करण्यात आले होते. तर ६ हजार रुपये देणाऱ्यांसाठी हे संकेतस्थळ चालू होते, वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी चक्क कृषि अधिक्षक कार्यालयात जाऊन नोंदणीसाठी अर्ज केले होते. तर ३ ऑक्टोबरला वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी चरखागृहात गेले. तेव्हा त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. येथे आयोजकांनी ठेवलेल्या बाऊन्सर्ससोबत शेतकऱ्यांची वादावादी झाली. शेवटी हा प्रकार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोले यांना कळताच ते चरखागृहात पोहोचले आणि कृषि अधिक्षक यांच्याशी चर्चा करून या शेतकऱ्यांना नंतर प्रवेश देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *