सिडनी, दि. १४ वृत्तसंस्था:आज सिडनीच्या बॉन्डी बीचवर दोन बंदुकधार्यांनी गोळीबार केल्याने किमान १२ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ११ नागरिक असून एक हल्लेखोराचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार, संध्याकाळी झालेल्या या घटनेत अंदाजे ५० गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात २८ लोक जखमी झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बॉन्डीतील दृश्ये “धक्कादायक आणि अत्यंत दुःखद” असल्याचे म्हटले आहे. “पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी असून जीव वाचवण्यासाठी काम करत आहेत. या घटनेमुळे प्रभावित झालेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल माझ्या भावना आहेत. मी नुकतेच एएफपी आयुक्त आणि न्यू साऊथ वेल्सच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. आम्ही एनएसडब्ल्यू पोलिसांसोबत समन्वय साधत आहोत आणि अधिक माहिती निश्चित झाल्यावर पुढील अद्ययावत माहिती देऊ.परिसरातील लोकांनी एनएसडब्ल्यू पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे,” असे त्यांनी निवेदनात सांगितले.
भारतीय वेळेनुसार दुपारी सुमारे २.१७ वाजता न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी ‘X’ वर पोस्ट करून बॉन्डी बीचवरील होत असलेल्या घटनेला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले. घटनास्थळी असलेल्या प्रत्येकाने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असा इशाराही देण्यात आला. नंतर पोलिसांनी एका हल्लेखोराला ठार केले, तर दुसर्याला ताब्यात घेतल्याचे सांगितले.हा गोळीबार आठ दिवस चालणाऱ्या यहुदी उत्सव हनुक्काच्या पहिल्याच रात्री झाला.