केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी सर्वश्रुत आहेत. त्यांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे पाहायला मिळते. तसेच आता पुन्हा एकदा गडकरींनी सरकारी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. माझ्या राजकीय आयुष्यात माझ्याकडून आता चांगले रस्ते झाले आहेत, आता मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, किती सस्पेंड करतो याचा रेकॉर्ड माझ्या हातून झाला पाहिजे आणि यासाठी मी देशात हात धुवून मागे लागलो आहे, असे म्हणत नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.
नागपूर महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केंद्रीय परिवहन व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. जनतेला शिक्षा होते, पण जे अधिकारी नियमानुसार वेळेत काम करत नाहीत, त्यांचे काय करायचे? असा सवाल गडकरी यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी नागपूर महापालिका आयुक्तांना देखील चिमटे काढले.
नितीन गडकरी म्हणाले, आपण जनतेशी प्रामाणिक राहिले पाहिजे, गोड-गोड बोलतात म्हणून कोणाचे ऐकायचे काही कारण नाही, जनता हीच मालक आहे, ह्यांची कामे झाली पाहिजे. जी व्यवस्था न्याय देत नाही, ती उखडून टाकली पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. जी व्यवस्था सर्वसामान्यांना न्याय देत नाही, त्याला उखडून फेकले पाहिजे. मी काम केले नाही तर मुर्दाबाद करणे तुमचा अधिकार आहे, असे परखड मत गडकारींनी बोलून दाखवले.