देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात

उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : देशातील सर्वात मोठी सोलर मॉडेल इकोसिस्टीम नागपूर येथे आकार घेत आहे. येत्या दहा वर्षात नागपूर हे सोलर इकोसिस्टीम’चे हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील अवाडा समूहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच सोलर मॉडेल निर्मितीची पाहणी केली, त्यानंतर उद्योजकांशी संवाद साधला.

अवाडा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विनीत मित्तल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली, यावेळी राज्यातील पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि मुंबईच्या भविष्यातील बदलांवर उद्योजकांसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला.

नवीन नागपूरच्या प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येथे स्मार्ट इंडस्ट्रीसाठी इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पन्नास टक्क्यांपेक्षा जागा अधिकृत झाली असून गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळत आहे. देशातील पहिले सोलर मॉडेल अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात तयार होत असून अवाडा समूहाला त्यांच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी २५० एकर जागेची आवश्यकता असून ती देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात उद्योगांसाठी अधिग्रहीत केलेली जमीन संपली असून तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत तयार करावयाची आहे, तसेच वर्धा जिल्ह्यातील नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन सुरू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अवाडा हा सोलर मॉडेल बनवणारा सर्वात मोठा सुपर उद्योग असून, ? डेव्हान्स इंटीग्रेशनमुळे स्मार्ट मॉड्युलची निर्मिती होत आहे. भूमिपूजनानंतर वेगाने प्रकल्प पूर्ण झाला असून आज पाच हजार कामगार येथे काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, स्टील उद्योगांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योजकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २०२९ पर्यंत सोलर बॅटरी स्टोरेजच्या माध्यमातून २४ तास ऊर्जा उपलब्ध होईल, त्यामुळे उद्योजकांना विजेचा प्रश्न राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गडचिरोली हे नवीन स्टील सिटी म्हणून उद्यास येत असून तिथे चार लाख कोटींची गुंतवणूक आली आहे बेल्जियमच्या कंपनीसोबत गडचिरोलीत ग्रीन स्टील बनवण्याचा सामंजस्य करार झाला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या मागस भागात विकासाला आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण होत असून जेएनपीटी बंदरासोबतच वाढवण पोर्ट बंदर हे जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये समाविष्ट होणार आहे, येथून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरद्वारे गडचिरोली पर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.

यामुळे लॉजिस्टिक खर्च ६० टक्के पेक्षा कमी होईल आणि राज्याच्या विकासाला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. वाढवण बंदर येत्या तीन वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करताना वाढवण हे ग्रीन पोर्ट असून सर्वात सक्षम राहणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुंबई येथील विमानतळावर खाजगी विमानारांना कशा सुविधा देता येतील यासाठी विकासात व संबंधित यंत्रणांसोबत बोलून मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास उद्योजकांना दिला.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समूह विकास करण्याच्या दृष्टीने येथील रहिवाशांना पर्यायी घर देणे अथवा तीन वर्षांचे भाडे देत असल्यामुळे जागा मोकळी होण्यास मदत होत आहे. येत्या दहा वर्षात मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या पाच वर्षात मुंबईचा चेहरा बदललेला असेल असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, वांद्रे वर्सोवा मार्ग २०२८ पर्यंत तर वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ पोस्टल रोड मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मुंबईतील ६० टक्के प्रवाशांसाठी वेस्टन एक्सप्रेसवेला एक पूर्णपणे सिग्नल फ्री समांतर मार्ग तयार केला जात आहे. अवघ्या २३ किलोमीटरसाठी लागणारा दीड तासाचा वेळ या बोगद्यामुळे १५ ते १७ मिनिटांवर येणार आहे, हे काम पुढील चार वर्षात पूर्ण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *